#Chiplun:नमन व जाखडी सारख्या कलाप्रकारांना अनुदान व पेन्शन योजना लागू करावी - आ. शेखर निकम



महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव
कोकणात प्रसिद्ध असणाऱ्या खेळे, नमन व जाखडी सारख्या कलाप्रकारांना उर्जितावस्था देण्यासाठी त्यांना अनुदान देण्यात यावे व कलाकारांना पेन्शन योजना सुरू करावी अशी मागणी कोकणचे लोकप्रिय आमदार शेखर निकम यांनी कला व सांस्कृतिक मंत्रालयाकडे केली असून त्याला सुधीर मुनगंटीवार यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे व प्रधान सचिव (सांस्कृतिक कार्य) यांना प्रस्ताव सादर करावयास सांगितले आहे.

महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यामध्ये लोककला अभिजात कलासंस्कृतीचे दर्शन अखिल जगाला घडवितात. त्या कला संपुष्टात येऊ नयेत, बदलत्या काळाशी संघर्ष करत त्यांना तग धरता यावा यासाठी शासनाने अनुदान जाहीर केले आहे.
    
राज्यातील सांस्कृतिक व पारंपारीक कलेची लोकांना माहिती व्हावी तसेच त्यांचे जतन व संवर्धन करण्यासाठी राज्यात नाट्यसंगीत, नाट्य, चित्रपट, तमाशा फड, हंगामी तमाशा फड, लावणी कलापथक, दशावतार मंडळ, खडीगंमत कलापथक व शाहीरी पथके इ. ना अनुदान दिले जाते. मात्र मध्य कोकणातील खेळे, नमन व जाखडी या कलाप्रकारांना अनुदानाचा लाभ मिळत नाही. खेळे,
नमन व जाखडी हा कलाप्रकार कोकणामध्ये प्रसिद्ध असून अनेक वर्षे अनेक कलावंत आपली कला प्रदर्शित करून लोकांचे मनोरंजन व प्रबोधन करण्याचे काम करत आहेत. मात्र या कलाप्रकारांना अनुदान व कलाकारांना निवृत्ती वेतन योजना शासनाकडून दिली जात नाही.

बदलत्या काळानुसार नमन, जाखडी या सारखे अभिजात कोकणी कलाप्रकार काळाच्या ओघात गडप होण्याचा धोका संभवत असल्याने मध्य कोकणातील या पारंपारीक व सांस्कृतिक कलाप्रकारांना उर्जितावस्था देणे, त्या टिकवून ठेवणे याकरीता अनुदान व कलाकारांना निवृत्ती वेतन योजना लागू करणे अत्यंत आवश्यक आहे. या संदर्भात शासन स्तरावर सकारात्मक निर्णय व्हावा या हेतूने कलाकारांचे हित जपणाऱ्या आमदार निकम यांनी सदर मागणी केली आहे.

Comments

Popular posts from this blog

#Karunde कारूंडे येथील भीषण अपघातात माय लेकरांसह चार जण ठार, तिघे गंभीर जखमी

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत