#Yavat:अवयवदानाबाबत आघाडीवर जाऊया - प्रा. अक्षता थोरात


महादरबार न्यूज नेटवर्क - संतोष जगताप
विविध प्रकारचे दान हे भारतीय संस्कृतीचे आगळेवेगळे वैशिष्ट्य असून आपल्या देशात आता अवयवदान ही संकल्पनासुद्धा लोकसंख्येप्रमाणेच प्रथम क्रमांकावर पोहचणे गरजेचे असल्याचे मत अवयवदान उपक्रमाच्या समन्वयक प्रा. अक्षता थोरात ह्यांनी खुटबाव येथे दि( ८) रोजी व्यक्त केले.  येथील पोपटराव किसनराव थोरात महाविद्यालयातील अवयवदानविषयक जनजागृती सप्ताहाच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. प्रा. थोरात ह्यांनी ह्यावेळी अवयवदानाच्या बाबतीत भारतातील वास्तव परिस्थितीचा आढावा सादर केला.


श्रीलंकेसारखा छोटा शेजारी देश नेत्रदानाच्या बाबतीत आघाडीवर असून शिल्लक असलेल्या डोळ्यांची जगात निर्यात करतो. परंतु आपल्या देशात मात्र अनेक गरजूंना नेत्रदानाअभावी ही सृष्टी पाहता येत नाही. त्यामुळेच जगातील सर्वात जास्त अंध व्यक्तींच्या संख्येत भारत आघाडीवर असल्याची खंतही त्यांनी ह्यावेळी व्यक्त केली. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या अवयवदानविषयक पोस्टर्सच्या प्रदर्शनाने अवयवदानविषयक जनजागृती सप्ताहाचा प्रारंभ ह्यावेळी करण्यात आला.

ह्या सप्ताहामध्ये पथनाट्य, नाटिका, घोषवाक्ये, निबंध, वक्तृत्व ह्या स्पर्धांचे तसेच रॅलीचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती ह्या वेळी प्रा. अक्षता थोरात ह्यांनी दिली. ' दान पावलं ' हे सकाळ प्रकाशनाचे अवयवदानविषयक पुस्तक देऊन पोस्टर स्पर्धेतील सहभागी विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. जगदीश आवटे ह्यांनी केले. प्रा.विकास धुमाळ ह्यांनी आभार मानले तर साई दीक्षित ह्या विद्यार्थ्याने सूत्रसंचालन केले.

Comments

Popular posts from this blog

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत

#Natepute लक्ष्मीआई यात्रेनिमित्त शिदेंवाडीत कार्यक्रम