#Yavat:गोरक्षकांचा यवत पोलीस ठाण्यावर मोर्चा
महादरबार न्यूज नेटवर्क - संतोष जगताप
दौंड तालुक्यातील यवत पोलीस ठाण्यामध्ये गोरक्षकांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याच्या निषेधार्थ गोरक्षकांनी यवत पोलीस ठाण्यावर निषेध मोर्चा काढून पोलीस प्रशासनाचा निषेध व्यक्त केला.यावेळी विविध मागण्याचे निवेदन यवत पोलीस पोलिसांना विश्व हिंदू परिषदेच्यावतीने देण्यात आले.
यवत पोलीस ठाण्याचे अधिकारी गोरक्षकांना हीनपणाची वागणूक देत आहेत, गोरक्षकांवर गुन्हे दाखल करतात, कसायांवर गुन्हे दाखल असताना त्यांच्यावर कारवाई केली जात नाही, अवैधरित्या जनावरांची वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई होत नाहीत असे मत विश्व हिंदू परिषदेच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे.
गोरक्षकांवर झालेले खोटे गुन्हे तातडीने मागे घ्यावेत अन्यथा उग्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला. यावेळी गोरक्षकांनी पोलीस प्रशासनाच्या कारभारा विरोधात घोषणाबाजी केली. अखिल भारत कृषी गो सेवा संघ महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मिलिंद एकबोटे, सरसेनापती हंबीरराव मोहिते गोशाळा संस्थापक पंडीत दादा मोडक व विश्व हिंदू परिषद चे जिल्हा अध्यक्ष गणेश आखाडे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी ऋषिकेश कामठे, अहिरेश्वर जगताप, गणेश हुलावळे, उपेंद्र बलकवडे, राजेंद्र लाड तसेच पुणे जिल्ह्यातील गोरक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गोमांस किंवा गाई म्हैस कत्तलसाठी वाहतूक होत असलेबाबत गोरक्षकांनी तात्काळ पोलीस स्टेशन येथे संपर्क करावा.सर्व पोलीस अधिकारी यांचे भ्रमणध्वनी क्रमांक सर्व गोरक्षकांना दिले आहेत, कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी गोरक्षकांनी सहकार्य करावे असे उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्निल जाधव यांनी सांगितले आहे. गोरक्षकांवरील दाखल असलेल्या गुन्ह्याचा तपास करून योग्य ती कारवाई केली जाईल असे यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी सांगितले आहे.
Comments
Post a Comment