#Chiplun:चिपळूण शहरातील वाशिष्ठी गाळ उपशासाठी ९.८० कोटी निधीची तरतूद व्हावी - आ.शेखर निकम


महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव
राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाकडून चिपळुणातील वाशिष्ठी नदीतील गाळ उपशाचे काम सुरू आहे. पूरमुक्त चिपळूणसाठी अजूनही मोठ्या प्रमाणावर गाळ उपसा व बेटे काढण्याची आवश्‍यकता आहे. तरी या बाबीची दखल घेऊन हिवाळी अधिवेशनामध्ये पुरवणी यादीमध्ये वाशिष्ठी नदीतील गाळ काढण्यासाठी ९.८० कोटी रूपयांच्या निधीची तरतुद करावी, अशी मागणी चिपळूण-संगमेश्‍वर विधानसभा मतदार संघाचे आमदार शेखर निकम यांनी  राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांच्याकडे केली आहे. दरम्यान, ना. पवार याबाबत सकारात्मक असल्याने वाशिष्ठी गाळ उपशाच्या कामाला अधिक गती प्राप्त होण्याची शक्यता आहे.  चिपळूण शहरातील वाशिष्ठी नदीमध्ये जुलै २०२१ उद्भवलेल्या महापूर परिस्थितीमध्ये चिपळूण शहरामध्ये पुराचे पाणी शिरून मोठ्या प्रमाणात वित्तहानी झालेली होती. चिपळूण बचाव समिती व नागरिकांच्या लढ्यानंतर राज्य शासनाने वाशिष्ठी नदीतील गाळ व बेटे काढण्यासाठी निधी उपलब्ध करुन दिलेला होता. त्यानुसार गाळ उपशाचे काम गतवर्षीपासून सुरू आहे. पावसाळ्यानंतर वाशिष्ठी नदीतील गाळ काढण्याच्या कामासंदर्भात अधिकारी व चिपळूण बचाव समिती यांच्यासोबत २८ ऑक्टोबर २०२३ रोजी बैठक पार पडली होती. त्यामध्ये वाशिष्ठी नदी टप्पा-१ मध्ये शासनाने उपलब्ध करुन दिलेल्या निधी मधून सन २०२१ ते २०२३ मध्ये अंदाजे १२ लक्ष घ.मी. इतका गाळ काढण्यात आलेला आहे. मात्र सद्यस्थितीत नदीपात्रामध्ये अजून ४० लक्ष घ.मी. इतका गाळ काढायचा शिल्लक आहे.

आताच्या पावसाळ्यामध्ये नदीपात्रातील गाळात आणखीच वाढ झालेली आहे. चिपळूण शहराला महापूराच्या धोक्यापासून वाचविणे आवश्‍यक असल्याने यापैकी १२ लक्ष घ.मी. इतका गाळ तातडीने काढणे अत्यंत आवश्‍यक असून त्यास अंदाजे ९.८० कोटी रूपयांच्या इतका निधीची आवश्‍यकता आहे. तरी ही बाब लक्षात घेता आता होणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये पुरवणी यादीमध्ये चिपळूण शहरातील वाशिष्ठी नदीतील गाळ काढणेसाठी रुपये ९.८० कोटी इतक्या निधीची तरतूद व्हावी, अशी मागणी आमदार शेखर निकम यांनी ना. अजितदादा पवार यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे.

Comments

Popular posts from this blog

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत

#Natepute लक्ष्मीआई यात्रेनिमित्त शिदेंवाडीत कार्यक्रम