#Nagapur:मराठा आणि धनगर समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आ. शेखर निकम यांची अधिवेशनात मागणी


महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव
मराठा आणि धनगर समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आग्रही मागणी चिपळूण-संगमेश्वरचे लोकप्रिय आमदार शेखर निकम यांनी नागपूर अधिवेशनात केली.
    
सध्या सुरू असलेल्या नागपूर अधिवेशनात आमदार शेखर निकम यांनी आपले म्हणणे मांडताना सांगितले की, सध्या राज्याचे मुख्यमंत्री त्याचबरोबर दोन्ही उपमुख्यमंत्री अतिशय प्रामाणिकपणे काम करत आहेत. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आपण राज्याच्या मुख्यमंत्र्यांनादेखील पुरेसा वेळ देण्याची गरज आहे. मराठा समाजाला न्याय हक्काचे आरक्षण मिळालेच पाहिजे या भावनेतूनच मी बोलत आहे. कुणबी ही वेगळी जात आहे आणि मराठा हा वेगळा समाज आहे. त्यामुळे कुणबी समाजाच्या हिश्याच्या जागा न हिरावता मराठा समाजाला स्वतंत्र जात म्हणून आरक्षण दिले गेले पाहिजे. मराठा खूप काही श्रीमंत आहे अशी जी समज आहे ती थोडीशी चुकीची आहे. कोकणातला मराठा समाज आरक्षणापासून वंचित आहे. या समाजाला शिक्षणासाठी स्कॉलरशिप 100% करणे गरजेचे आहे. तसेच इतर गोष्टीसाठी तरुणांना प्रोत्साहन देण्यासाठी उद्योग धंदा निर्मिती असेल, ग्रामीण पर्यटन असेल, छोटे-मोठे बंधाऱ्याच्या निमित्ताने शेतीकडे पुन्हा बघायचं असेल ह्या गोष्टी होणं गरजेचं आहे. त्यासाठी कोणत्याही जाचक अटी न लावता व्यावसायिक कर्ज मिळाले पाहिजे. यात कोणतेही राजकारण न करता विचार करून कोणत्याही परिस्थितीत आणि चांगल्या पद्धतीने आरक्षण मिळावे ही अपेक्षा व्यक्त करतो.

त्याचबरोबर धनगर समाजाला देखील आरक्षण मिळण्याच्या बाबतीतला शासन निश्चित विचार करेल पण त्यापूर्वी माझी कोकणाच्या निमित्ताने एवढीच अपेक्षा आहे की, आमचा धनगर समाज अतिशय गरीब आहे. तो खूप डोंगरांमध्ये राहत असतो. तिथे जाण्यासाठी रस्ते सुद्धा नाहीत, धनगरांच्या जागा ज्या जागेमध्ये घर आहे ती घरे त्यांच्या नावाने नाही, शिक्षणासाठी काही अडचणी येतात त्या शिक्षणाच्या अडचणी देखील सोडवण्यासाठी सरकारने प्रयत्न करावा व या प्रक्रियेत विरोधी पक्षाने विरोध न करता समन्वयाने सरकारला सहकार्य करावे, अशी अपेक्षा आमदार शेखर निकम यांनी यावेळी व्यक्त केली.

Comments

Popular posts from this blog

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत

#Natepute लक्ष्मीआई यात्रेनिमित्त शिदेंवाडीत कार्यक्रम