Hot Posts

6/recent/ticker-posts

#Chiplun:शिस्त, संस्कार आणि ज्ञानाची शिकवण देणारा गुरू हरपला

माखजन इंग्लिश स्कूलचे माजी मुख्याध्यापक एस.वाय. रानडे यांचे दुःखद निधन


महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव
येथील माखजन इंग्लिश स्कूलचे माजी मुख्याध्यापक एस.वाय. रानडे यांचे दुःखद निधन झाले. अत्यंत शिस्तप्रिय, इंग्रजी विषयाचे गाढे अभ्यासक म्हणून ते प्रसिध्द होते.
    
माखजन इंग्लिश स्कूलचे माजी मुख्याध्यापक  एस.वाय. रानडे यांचे रत्नागिरी येथे गुरुवार १ फेब्रुवारी रोजी दुःखद निधन झाले. मृत्युसमयी त्यांचे वय ८५ वर्षे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली आणि नातवंडं असा परिवार आहे.
    
अत्यंत शिस्तप्रिय, इंग्रजी विषयाचे गाढे अभ्यासक, शेकडो विद्यार्थ्यांचा इंग्रजी विषयाचा पाया मजबूत केलेले, विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत महत्वाची भूमिका बजावणारे एस.वाय. रानडे यांच्या निधनामुळे त्यांच्या विद्यार्थी वर्गात मोठी शोककळा पसरली आहे. आज मोठमोठ्या पदावर काम करणाऱ्या विद्यार्थांना घडविणारे रानडे गुरूजींचा इंग्रजी हा आवडता विषय आणि गणित विषयात निपुण होते. आपल्या विद्यार्थ्यांना ज्ञानदान देण्यासोबत त्यांनी शिस्तीचे आणि संस्काराचे देखील धडे दिले. रानडे गुरूजींनी दिलेली शिकवण, प्रसंगी विद्यार्थ्यांना चांगले वळण आणि चांगले संस्कार देताना दिलेल्या छडीची आठवण आजही अनेक विद्यार्थी विसरलेले नाहीत.
     
आपल्या हातून एक चांगली पिढी घडली तर ती पुढची चांगली पिढी घडवत असते यावर रानडे गुरूजींचा विश्वास आणि भर होता. त्यामुळे त्यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात अगदी शाळेत शिकवताना आणि निवृत्ती नंतर देखील विद्यार्थ्यांना उत्तम मार्गदर्शन करण्याचे काम केले. रानडे गुरूजी विद्यार्थ्यांना शिस्त लावण्यासाठी जितके कडक वागले तितक्याच प्रेमाने त्यांनी विद्यार्थांचे लाड देखील केले. त्यामुळे गुरुजींच्या जाण्याने त्यांचा विद्यार्थी वर्ग हळहळ व्यक्त करत आहे आणि "हे देवा, आमचा देव तुझ्याकडे येत आहे त्यांच्या पवित्र आत्म्यास शांती दे" अशी ईश्वराला भावनिक साद घालत आहे.

Post a Comment

0 Comments