#Chiplun तांडा वस्ती सुधार योजनेंतर्गत चिपळूण-संगमेश्वर तालुक्यासाठी शेखर निकम यांच्या प्रयत्नाने सुमारे ३ कोटींचा निधी मंजुर
महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव
वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजनेअंतर्गत सन २०२३/२४ करिता रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण-संगमेश्वर तालुक्यातील कामांना प्रशासकीय मान्यता व निधी वितरित करण्यात आला असून याचे सर्व श्रेय तालुक्याचे आमदार शेखर निकम यांचे आहे.
महाराष्ट्र राज्यात विमुक्त जाती, भटक्या जमाती प्रवर्गात अनेक जाती-जमाती असून अद्यापही भटकंती करून स्थलांतरित स्वरूपाचे जीवन जगत आहेत. लमान, बंजारा, वंजारी, धनगर, पारधी अशा अनेक समूहांचे तांडे, वस्त्या असून अशा तांड्यामध्ये या जाती-जमातीचे लोक अनेक वर्षांपासून राहत असले तरी अशा तांडे किंवा वस्त्यांना प्राथमिक सुविधा उपलब्ध होत नाहीत व त्यामध्ये आधुनिकतेकडे कल असला तरी या प्रवर्गातील बहुसंख्य समाज गरिबीचे जीवन जगत आहे. तांडे, वाडी किंवा वस्त्या यामध्ये सध्या या प्रवर्गातील समाज ज्या ठिकाणी वास्तव्यास आहे त्याच ठिकाणी या समाजात स्थिर जीवन जगता यावे याकरिता त्यांना काही अत्यावश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.
त्या अनुषंगाने वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजनेअंतर्गत जिल्हास्तरीय समितीने शिफारस केलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण-संगमेश्वर तालुक्यातील ३५ कामांना प्रशासकीय मान्यता व सदरहू कामांना आवश्यक असणारा ३ कोटी ९६ लाख ५० हजार इतक्या निधीस मंजुरी देण्यात आली आहे. तथापि सदर ३५ कामांसाठी सद्यस्थितीत ८० लाख रुपये इतका निधी वितरित करण्यात येत असून उर्वरित निधी कामांच्या पूर्ततेनुसार व निधीच्या उपलब्धतेनुसार वितरित करण्यात येणार आहे.
सदर निधी उपलब्ध करून देण्यासाठी आमदार शेखर निकम यांनी वेळोवेळी शासन दरबारी कागदोपत्री व्यवहार करून तसेच अधिवेशनांमध्ये आपल्या भागातील समस्या मांडून मागणी केली होती. त्यांची ही मागणी पूर्ण होऊन चिपळूण-संगमेश्वर तालुक्यासाठी जवळपास ३ कोटी ९६ लाख ५० हजार निधी मंजूर करून आणण्याचे श्रेय आमदार निकम यांनाच जाते. त्यामुळे पुन्हा एकदा तालुक्याचे कार्यक्षम व काळजीवाहू आमदार म्हणून शेखर निकम यांचे ग्रामस्थांनी आभार मानले आहे.
Comments
Post a Comment