#Chiplun जि.प.शाळा धामणी नं.२चे पदवीधर शिक्षक अंकुश गुरव यांचा सेवापुर्ती सोहळा उत्साहात संपन्न
महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव
जिल्हा परिषद शाळा धामणी नं.२ चे पदवीधर शिक्षक श्री. अंकुश गुरव आपल्या ३७ वर्षाच्या शिक्षण खात्यातील प्रदीर्घ सेवेतून दिनांक ३१ ऑक्टोबर २०२४रोजी सेवानिवृत्त होत असल्याने त्यांचा अभिष्टचिंतन सेवापूर्ती सोहळ्याचे आयोजन जि.प.शाळा धामणी नं.२ येथे शाळा व्यवस्थापन समिती धामणी तसेच धामणी आणि अंत्रवली केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानाने करण्यात आले होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धामणी व अंत्रवली केंद्राचे केंद्रप्रमुख श्री.भास्कर जंगम सर तसेच प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ उद्योजक श्री प्रभाकर घाणेकर हे होते. सेवापुर्ती सोहळ्याच्या सुरुवातीला शाळा व्यवस्थापन समिती धामणी तसेच धामणी, अंत्रवली केंद्र, जि.प. शाळा धामणी नं. २ आणि उपस्थित मित्रपरिवार यांनी श्री अंकुश गुरव यांचा श्रीफळ, शाल, पुष्पगुच्छ आणि भेट वस्तूच्या माध्यमातून सपत्नीक सत्कार केला यावेळी अनेक मान्यवर तसेच शिक्षक यांनी सेवानिवृत्त शिक्षक श्री.अंकुश गुरव यांच्या शैक्षणिक तसेच सामाजिक कार्याचा आढावा घेतला.
श्री अंकुश गुरव यांचा गुणगौरव करताना मान्यवर म्हणाले ,की श्री. गुरव हे अत्यंत प्रामाणिक, शिस्तप्रिय, तितकेच प्रेमळ आणि विद्यार्थी तसेच शिक्षक प्रिय शिक्षक होते. त्यांच्याबद्दल पालक वर्गामध्ये मोठी आदराची भावना होती.श्री रमेश गोताड-संचालक, शिक्षक पतपेढी देवरुख यांनी श्री.गुरव यांच्या बालपणापासूनचा आढावा घेताना म्हणाले की श्री.अंकुश गुरव यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून आपले शिक्षण पूर्ण केले. डी.एड् तसेच बी.एड् करताना एक हुशार विद्यार्थी म्हणून त्यांनी आपली छाप पाडली होती .आपल्या हुशारीचा लाभ अखंड सेवेमध्ये आपल्या विद्यार्थ्यांनाही त्यांनी दिला.
ज्येष्ठ उद्योजक श्री. प्रभाकर घाणेकर म्हणाले की अंकुश गुरव यांचे धामणी नं.२ शाळेच्या विकासासाठी असलेले योगदान व त्यांनी निष्ठेने केलेली शिक्षक सेवा आणि आपल्या संपूर्ण सेवेत त्यांनी पाळलेला वक्तशीरपणा, नियोजन अशा कामाबद्दल गौरवोद्गार काढले.
शिक्षण क्षेत्राबरोबर सामाजिक क्षेत्रात देखील त्यांनी भरीव कार्य केले आहे.कोविडमध्ये ग्रामस्थांना केलेली मदत, समाजाच्या सुखदुःखात सहभाग, वेळोवेळी केलेले आर्थिक सहकार्य इत्यादीचा उल्लेख मान्यवरांनी यावेळी केला. श्री.गुरव सरांनी शिक्षक म्हणून ज्या ज्या शाळेत काम केले आहे.तिथे शाळेला विविध पुरस्कार तसेच विद्यार्थ्यांना गुणवत्ता विकासासाठी भरीव कामगिरी केली आहे.तसेच संपूर्ण सेवेमध्ये १४ वेळा अत्युत्कृष्ट कामाची नोंद सुध्दा झालेली आहे. शिष्यवृत्ती, नवोदय परीक्षेत त्यांचे विशेष योगदान लाभले आहे .
गुरव सर एक अष्टपैलू शिक्षक,एक उपक्रमशील शिक्षक म्हणून त्यांची ओळख होती अशा शब्दात मान्यवरांनी त्यांचा गौरव केला.या कार्यक्रमाला निवृत्त शिक्षक श्री. श्रीकृष्ण खातू,श्री. अशोक टाकळे, श्री. दिलीप महाडिक ,श्री. रुपेश जाधव ,श्री. शेळके सर, श्री.जयंत शिंदे, सौ.रसिका शिंदे, श्री.संदिप गायकवाड ,श्री.नितीन थेराडे,श्री. संजय कुंभार ,श्री.सुभाष जाधव, श्री. प्रकाश गेल्ये. श्री.कारभारी वाडेकर इत्यादी उपस्थित होते. या सर्वांनी यावेळी आपले अनुभव कथन केले व त्यांच्या पुढील जीवन व आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या.
शिक्षक व हितचिंतक यांनी केलेला गौरव तसेच सन्मान यामुळे श्री.अंकुश गुरव भारावून गेले .त्यांनी आपल्या संपूर्ण सेवेत आलेले अनुभव व आपल्या वेगवेगळ्या मार्गाने मिळालेले सहकार्य याबद्दल कृतज्ञता व्यक्त करून सत्कार बद्दल धन्यवाद व्यक्त केले.या समारंभाला धामणी आणि अंत्रवली या दोन्ही केंद्रातील अनेक शिक्षक आणि शिक्षिका उपस्थित होत्या. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन श्री.मधुकर सानप यांनी केले.
Comments
Post a Comment