महादरबार न्यूज नेटवर्क -
विकसित कृषी संकल्प अभियान अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र मोहोळ द्वारे शिंदेवाडी तालुका माढा येथे दिनांक ०९ जून, २०२५ रोजी शेतकरी शास्त्रज्ञ संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. आधुनिक कृषि तंत्रज्ञान आणि खरीप हंगाम नियोजन प्रसारासाठी विकसित कृषी संकल्प अभियान दि. २९ मे ते १२ जून २०२५ या दरम्यान सोलापूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये पोहोचवण्याचे काम महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरी अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र मोहोळ, कृषी विभाग, महाराष्ट्र शासन आणि राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र सोलापूर, राष्ट्रीय भरड धान्य संशोधन संस्था, सोलापूर यांच्यामार्फत केले जात आहे.
माढा तालुक्यातील शिंदेवाडी येथे सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.अन्नशास्त्र व तंत्रज्ञान विषयाचे विषय विशेषज्ञ श्री. दिनेश क्षिरसागर यांनी कृषि मालाचे मूल्यवर्धन, ज्वारी व भरड धान्य प्रक्रिया, मसाले प्रक्रिया, दुग्ध प्रक्रिया, पापड उद्योग, कडधान्य प्रक्रिया आणि प्रधानमंत्री सुक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजना, महिला बचत गट सदस्यांसाठी बीज भांडवल सुविधा आणि अन्न प्रक्रिया लघु उद्योगाची सुवर्णसंधी याविषयी सविस्तर माहिती दिली.
डॉ. परशुराम पात्रोटी, वरिष्ठ शास्त्रज्ञ, केंद्रीय भरड धान्य संशोधन संस्था, सोलापूर यांनी भरड धान्याचे पौष्टिक तत्त्वे, विकसित वाण, बियाण्यांची उपलब्धता, लागवड तंत्रज्ञान आणि उद्योजकतेचे विकास याविषयी सविस्तर माहिती दिली. डॉ. शिल्पा परशुराम यांनी राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र, सोलापूर च्या शिफारशी बाबत सविस्तर माहिती दिली.
पीक संरक्षण विषयाचे विषय विशेषज्ञ डॉ. पंकज मडावी यांनी खरीप हंगामातील कीड व रोग व्यवस्थापन तंत्रज्ञानाबद्दल शेतकऱ्यांमध्ये जन जागृती केली. माती व पाणी परीक्षण आधारित खत व्यवस्थापन याबद्दल उपस्थित शेतकऱ्यांना मृद विज्ञान व कृषि रसायन शास्त्रं विषयाचे विषय विशेषज्ञ श्रीमती काजल जाधव म्हात्रे यांनी माहिती दिली.
याप्रसंगी शिंदेवाडी च्या सरपंच सौ मंदाकिनी शिंदे , मंडळ कृषि अधिकारी श्रीमती गायत्री चव्हाण, उप कृषि अधिकारी दादा पवार, सहायक कृषि अधीकारी श्री. राजशेखर कांबळे हे उपस्थित होते. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री सुयोग ठाकरे, कृषि मित्र, महिला स्वयं सहायता गटाचे सदस्य आदींचे सहकार्य लाभले.
0 Comments