महादरबार न्यूज नेटवर्क -
सोलापूर जिल्हा परिषदेच्या कारुंडे शाळेत यंदा इयत्ता दहावीचा वर्ग सुरु होतोय .....दहावीपर्यंतचा वर्ग सुरु करण्याचा जिल्हा परिषदेचा हा पहिलाच प्रयोग आहे. पहिल्यांदाच इयत्ता दहावीच्या वर्गाला मान्यता दिली असून डोंगराच्या कुशीत वसलेल्या या छोट्याशा गावातील विद्यार्थ्यांना आता गावातच दहावीपर्यंतचे शिक्षण मोफत मिळणार आहे .
सोलापूर जिल्हा परिषदेच्या वतीने शासनाच्या निर्णयाची अंमलबजावणी करताना 18 शाळांना वर्ग वाढीसाठी मंजुरी देण्यात आली असून कारुंडे शाळेमध्ये इयत्ता दहावीच्या वर्गाला मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे गावातील विद्यार्थ्यांना विशेषतः मुलींच्या शिक्षणाची सोय झाल्याने पालकांतून समाधान व्यक्त केले जात आहे.
कारुंडे हे सोलापूर पासून जिल्ह्यापासून दीडशे कि.मी. अंतरावरील शंभू महादेवाच्या डोंगर कुशीत वसलेल एक छोटंसं गाव. शेती भाती, गुर ढोरं आणि शेळ्या मेंढ्यांची राखणं करणारी खेडूत माणसं....दळणवळणाची मर्यादित साधने आणि भौतिक सुविधांचा अभाव यामुळे थोडंसं मागं पडलेलं हे गाव आता कात टाकतय....
गेल्या सात वर्षांपासून इथल्या जिल्हा परिषद शाळेने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.गावची शाळा गावचा अभिमान आणि आस्थेचे केंद्र बनली आहे. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानामध्ये या शाळेने जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांक मिळविला व संपूर्ण जिल्ह्यामध्ये नाव केले. लोक वर्गणीच्या माध्यमातून आतापर्यंत २१ लाख ३५ हजार रुपये गोळा करून शाळेचा संपूर्ण कायापालट केला आहे .शाळेचा संपूर्ण परिसर नयनरम्य व देखणा झाला आहे. शैक्षणिक गुणवत्ता, सहशालेय उपक्रम, क्रीडा स्पर्धा अशा सर्व विभागांत शाळा अव्वल स्थानी पोहोचली आहे. शाळेत कार्यरत शिक्षकांनी यासाठी मोठे योगदान दिले असून हक्काच्या उन्हाळा सुट्टीत देखील एकही दिवस सुटी न घेता जादा तास इथे घेतले जात आहेत.
शाळेच्या विस्तार वाढीसाठी ग्रामपंचायतीने तीन एकर जागा शाळेला दिली असून याठिकाणी आणखी सुसज्ज इमारत, क्रीडांगण व अन्य सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. नजीकच्या काळामध्ये डोंगरकुशीत झाडं फुलांनी नटलेली ही शाळा शैक्षणिक पर्यटन स्थळ करण्याचा निर्धार ग्रामस्थांनी केल्याचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अमोल पाटील यांनी सांगितले.
सातारा जिल्ह्याच्या सरहद्दीवर असलेल्या दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना आपल्याच गावात शिक्षण मिळावे यासाठी सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम , शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी विशेष पाठपुरावा केला.वर्ग वाढ व दर्जा वाढ यासाठी वरिष्ठ कार्यालयाकडे गटशिक्षणाधिकारी सुषमा महामुनी , विस्ताराधिकारी प्रदीप करडे यांचे अनमोल सहकार्य लाभले असून ग्रामीण भागात गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची सोय परिसरातच उपलब्ध झाल्याने नागरिकांतून आनंद व्यक्त केला जात आहे.
0 Comments