Hot Posts

6/recent/ticker-posts

#Malshiras मळोली गावचा मोडी प्रशिक्षण वर्गात डंका!

समरसिंग शिंदे प्रथम, मदनसिंह जाधव व अक्षयकुमार भगत यांचेही घवघवीत यश.


महादरबार न्यूज नेटवर्क -
महाराष्ट्र शासनाच्या पुराभिलेख संचालनालयाच्या वतीने सोलापूर येथील व्ही.जे. शिवदारे कॉलेज ऑफ आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स मध्ये नुकतीच मोडी लिपी प्रशिक्षण परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून मळोली गावचा मोडी प्रशिक्षण वर्गात अक्षरशः डंका वाजला आहे. या परीक्षेत मळोली गावचे सुपुत्र समरसिंग मानसिंग शिंदे यांनी प्रथम क्रमांक पटकावला, तर मदनसिंह अमरसिंह जाधव आणि अक्षयकुमार रामचंद्र भगत यांनीही उच्च गुणांसह उल्लेखनीय कामगिरी केली आहे. या तिघांच्या यशामुळे मळोली गावाचे नाव जिल्हाभर गाजत असून, गावात सर्वत्र अभिमान आणि आनंदाचे वातावरण आहे.


मोडी लिपी ही मराठी संस्कृतीचा प्राण असून, ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील राजकारभाराची अधिकृत लिपी होती. हजारो ऐतिहासिक दस्तऐवज, वंशवृक्ष, जमीन नोंदी आणि सरकारी कागदपत्रे आजही या लिपीत उपलब्ध आहेत. अशा स्थितीत मोडी लिपी शिकून तिचा प्रसार करण्याचे कार्य ही आजच्या काळातील एक ऐतिहासिक जबाबदारी ठरते. ही जबाबदारी पार पाडणारे मळोली गावचे हे तिन्ही विद्यार्थी आज जिल्ह्यात आदर्श ठरत आहेत.

या यशाबद्दल मोडी प्रशिक्षक गवळी सर म्हणाले की, “विद्यार्थ्यांनी अत्यंत शिस्तबद्ध आणि जिद्दीने अभ्यास केला. समरसिंग शिंदे यांचा अभ्यासाचा दृष्टिकोन आणि समर्पण सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.” तर दुसरे प्रशिक्षक फुलकरी सर म्हणाले, “या तिघांनी मोडी लिपीचा आत्मा समजून घेतला आहे. त्यांनी ही लिपी केवळ शिकली नाही, तर तिच्या संवर्धनाची जबाबदारी स्वीकारली आहे.”

या प्रशिक्षण शिबिराच्या यशामागे शिवदारे कॉलेजचे प्राचार्य सूत्रांवे सर यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन विशेष महत्त्वाचे ठरले. त्यांनी सांगितले, “मोडी लिपी ही आपल्या इतिहासाशी जोडणारा एक सजीव दुवा आहे. या विद्यार्थ्यांच्या यशामुळे कॉलेजचं नाव उंचावलं आहे.” तसेच बावजे मॅडम यांनी प्रशिक्षण वर्गाचे नियोजन, विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन आणि परीक्षा प्रक्रिया काटेकोरपणे पार पाडून शिबिर यशस्वी केले.

या तिन्ही विद्यार्थ्यांच्या यशामुळे मळोली गावात आनंदाचे वातावरण आहे. ग्रामस्थ, शिक्षकवर्ग आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांचा सत्कार करून अभिनंदनाचा वर्षाव केला. गावकऱ्यांनी या तिकडीकडून मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या आहेत. त्यांचे म्हणणे आहे की, “आजही गावातील अनेक जुने दफ्तरे, जमीन नोंदी आणि पत्रे मोडी लिपीत आहेत. आता ही तिकडी ती वाचून दाखवू शकेल, त्याचा अर्थ समजावून सांगू शकेल. त्यांनी मोडी लिपी वाचन केंद्र सुरू करून गावातील तरुणांना या लिपीचे प्रशिक्षण द्यावे, अशी आमची अपेक्षा आहे.”

समरसिंग शिंदे, मदनसिंह जाधव आणि अक्षयकुमार भगत या तिघांनीही गावकऱ्यांच्या अपेक्षांचा सन्मान ठेवत पुढे मोडी लिपी वाचन, लेखन व भाषांतर या क्षेत्रात कार्य सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, “गावकऱ्यांच्या जुन्या दस्तऐवजांचे अर्थ समजून देणे आणि मोडी लिपीची ओळख प्रत्येक घरापर्यंत पोहोचवणे हे आमचे पुढील ध्येय आहे.”

मळोली गावातून उमटलेला हा मोडीचा डंका आता सोलापूर जिल्हाभर झंकारत आहे. इतिहास आणि परंपरा जपण्याचे कार्य या तरुण तिकडीने हाती घेतल्याने मळोली गाव मोडी शिक्षणाचे नवे प्रेरणास्थान बनत आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे मराठी भाषेचा आणि संस्कृतीचा वारसा अधिक दृढ होईल, अशी खात्री गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे. या तिघांच्या यशामुळे मळोली गावाचा मान केवळ जिल्हा नव्हे तर संपूर्ण राज्यभर उंचावला आहे.

Post a Comment

0 Comments