महादरबार न्यूज नेटवर्क -
धनगर समाजाच्या अनुसूचित जमाती (एस.टी.) आरक्षणाची तात्काळ अंमलबजावणी व्हावी यासाठी आंदोलनाची ज्वाला अधिक तापत चालली आहे. संविधानाच्या क्रमांक ३६ नुसार आरक्षणाचा स्पष्ट हक्क असतानाही, गेल्या अनेक दशकांपासून धनगर समाज शासनाच्या अन्यायकारक वागणुकीमुळे हक्कापासून वंचित आहे. शेकडो आंदोलनांचे इतिहास, उपोषणांतून अर्पण झालेले आरोग्य, हजारो बांधवांवर दाखल गुन्हे — तरीही सत्ता आणि प्रशासकीय यंत्रणा धनगर समाजाच्या न्याय्य मागण्यांवर अद्यापही मुर्दाडपणे मौन बाळगत आहे.
या अन्यायाविरोधात पेटलेल्या लढ्याला नवी धार देण्यासाठी जालना येथे सलग १६ दिवस उपोषण करत रणशिंग फुंकणारे, धनगर आरक्षण मुक्तिसंग्राम लढ्याचे पुरस्कर्ते दीपकभाऊ बोऱ्हाडे रविवारी ठाण्यात दाखल झाले. जांभळी नाका येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकाला वंदन करून त्यांनी ठाण्यातील समाजबांधवांशी संवाद साधला. स्मारक परिसरात ठाणे शहरभरातून समाजबांधव मोठ्या संख्येने एकत्र जमले होते.
धनगर एस.टी. आरक्षणाची त्वरित अंमलबजावणी करावी यासाठी येत्या २१ जानेवारी २०२६ रोजी मुंबईच्या आझाद मैदानात भव्य आंदोलन होणार आहे. या संदर्भातील नियोजन बैठकीत करण्यात आले. यावेळी धनगर समाजाचे नेते महादेव अर्जुन, शंकर कोळेकर, मल्लिकार्जुन पुजारी, ॲड नानासाहेब मोटे,ॲड प्रकाश पुजारी,निहारिका कोंदले,दीपक देवकाते,राजेंद्र शेळके,राजू जांगळे,धनगर प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक कुरकुंडे,डॉ. अरुण गावडे,दादा पडळकर, महेश गुंड, प्रसाद वारे, राजेश वारे,अविनाश लबडे, संतोष बुधे, सचिन बुधे, अरुण परदेशी,जालिंदर पांढरे,कुमार पळसे,दीपक झाडे,उद्धव गावडे,किरण धायगुडे,सुनील पळसे,संदीप माने,सचिन झोरे,अखिलेश पाल,मधुकर गडदे सर, सौदागर खरात,भीमराव जानकर,नरेश शिरगिरे,प्रमोद वाघमोडे,सुनील राहिंज,अमोल गावडे यांच्यासह मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते. धनगर प्रतिष्ठान, ठाणे जिल्हा यांच्या वतीने बैठकीचे नियोजन करण्यात आले होते.
संविधानानुसार ३६ क्रमांकावर धनगर समाजाला आरक्षण मंजूर असताना सुद्धा अनेक वर्षे आरक्षणापासून वंचित ठेवले गेले आहे. शेकडो आंदोलने, उपोषणे, हजारो बांधवांवर दाखल गुन्हे — असे असतानाही लढा सुरू आहे . जालना येथे १६ दिवसांचे उपोषण प्रकृती बिघडल्याने स्थगित केले असले तरी“आता हा लढा अधिक तीव्र झाला आहे” असे धनगर आरक्षण योद्धा दीपकभाऊ बोऱ्हाडे यांनी सांगितले.नरेंद्र मोदी व देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिल्याप्रमाणे धनगर समाजाने भारतीय जनता पार्टीला सत्ता दिली.तरी देखील सरकार समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवत आहे. त्यामुळे आता आम्ही गप्पा बसणार नाही.धनगर आरक्षण मुक्ती संग्राम लढा जालना येथून सुरू झाला असून मुंबईतील आझाद मैदानात आरक्षणाची ‘आझादी’ मिळेपर्यंत हा लढा थांबणार नाही, त्यामुळे सर्व समाजबांधवांनी २१ जानेवारी २०२६ आझाद मैदान, मुंबई येथे मोठ्या संख्येने उपस्थित रहा असे आव्हान दीपकभाऊ बोऱ्हाडे यांनी केले.
0 Comments